विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार.
गुन्हेगारांच्या हालचालीवर पोलिसांची राहणार करडी नजर.

सोलापूर / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण पोलिसांनी शहर व जिल्ह्यातील रेकॉर्डवरील जवळपास आठ हजार सराईत गुन्हेगारांची पोलिस ठाणे निहाय यादी तयार केली आहे.
या सर्व गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारी, एमपीडीए यासारखी कारवाई करण्यात येणार आहे सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून त्यातील सुमारे ५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, १४० जणांविरुध्द तडीपारी, ४० जणांवर एमपीडीएची कारवाई प्रस्तावीत करण्यात येणार आहे.
तसेच सोलापूर शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील २ हजार ८०० गुन्हेगारांची यादी तयार केली असून त्यातील २ हजार ७५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६० जणांविरुध्द तडीपारी तर ५ जणांविरुध्द एमपीडीएची कारवाई प्रस्तावीत करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २२ ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. ३० ऑक्टोबरला अर्जाची छाननी होवून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल. त्यानंतर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्या दिवसापासून उमेदवारांना पुढे १८ नोव्हेंबरपर्यंत प्रचार करता येईल. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
या काळात पोलिसांचे त्यांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष राहणार आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही गुन्हा केल्यास पुढे त्यांच्यावर स्थानबद्धतेची किंवा तडीपारीची कारवाई होवू शकते.त्यामुळे सर्वांनी शांतता पाळावी, लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
निवडणूक काळात सामाजिक शांतता व ‘सुव्यवस्थेला बाधा होईल, असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांचे नेहमीच लक्ष असते, पण निवडणूक काळात विशेष लक्ष राहणार आहे.