crime
सांगोला तालुक्यातील कोळा येथे खून; पो.नि.भिमराव खणदाळे यांच्या टीमने एका तासात आरोपी ला ठोकल्या बेड्या.
सांगोला / तालुका प्रतिनिधी
मुकादमाकडून आठवड्याच्या मजुरीचे पैसे आणण्यासाठी गेलेल्या मजुराचा धक्का लागल्याच्या कारणावरून एकाने चाकूने भोसकून खून केल्याची घटना कोळा गावातील करगणी रोडवरील संगम चायनीज समोर घडली आहे. पोपट भगवान आलदर वय ५० असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी मयताचा मुलगा विशाल पोपट आलदर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश दत्तू आलदर रा. कोळा ता. सांगोला याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी विशाल पोपट आलदर हे संत तुकाराम नगर आलदर वस्ती कोळा ता. सांगोला येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ८ नोव्हेंबर रोजी फिर्यादीचे वडील पोपट भगवान आलदर हे आठवडा मजुरीचे पैसे आणण्यासाठी मुकादम दाजी आलदर रा. कोळा यांच्याकडे चालत कोळा गावात गेले होते. रात्री नऊच्या सुमारास ते अजुन परत आले नव्हते. वडिलांना घरी उशीर झाला असून अजून ते घरी कसे परत आले नाहीत म्हणून विशाल याने वडिलांच्या मोबाईलवर फोन लावला. पण फोन स्वीच ऑफ येत होता म्हणुन त्यांनी वडीलांचे मित्र गणेश सरगर यांच्या मोबाईलवर फोन लावून वडीलांचा पगार अजून झाला नाही काय, वडील कुठे आहेत असे विचारले. त्यावर त्यांनी पोलीस पाटलाच्या घराजवळ गावात वडीलांची भांडणे झाली आहेत, तू गावात लवकर ये असे म्हणून फोन कट केला. याबाबत विशाल याने आईला सांगीतले असता वडीलांच्या गळयात सोन्याची चेन आणि हातात दोन अंगठ्या असल्याचे आईने सांगितले. त्यानंतर विशाल व त्यांची आई वंदना असे दोघेजण कोळा गावात गेले. त्यावेळी गावातील विशाल मोरे यांच्या घराजवळ, संगम चायनीज समोर, करगणी रोडवर गर्दी जमलेली दिसली. दोघांनी त्या ठिकाणी जावून पाहिले असता वडील पोपट भगवान आलदर हे स्स्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. वडील मयत झाल्याचे लक्षात आल्याने जमलेल्या लोकांनी त्यांना सावरुन बसवले. तेथे असलेले फिर्यादीचे मामा ज्ञानेश्वर विठोबा गोरड रा. कोळा ता. सांगोला यानी फिर्यादी विशाल यास सांगीतले की, रात्री साडेआठच्या सुमारास प्रकाश दत्तू आलदर रा. कोळा याने वडील पोपट आलदर यांचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून भांडणे चालू केली. मोठ्याने शिवीगाळी करीत अचानक जवळील चाकूने पाठीत बेछुट वार करुन भोसकून खून केला. त्यावेळी तो हातात चाकू घेवून तेथून पळून गेला, असे विशाल आलदर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मयताचा मुलगा विशाल पोपट आलदर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश दत्तू आलदर रा. कोळा ता. सांगोला याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी भेट देऊन तपास कामीमार्गदर्शन केले सदर खुनाच्या घटनेतील आरोपीला पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांच्या टीम ने एका तासात आरोपी ला गजाआड केले असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.