Sangola

सांगोला तालुक्यात बोगस औषध विक्रेत्यांचा सुळसुळाट;औषध प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज.!

सांगोला / प्रतिनिधी

  गुडघेदुखी, सांधेदुखी,वात यावर आठवडे बाजारात आणि गावोगावी फिरस्त्या बोगस औषध विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. यावर कारवाई होणे गरजेचे असताना आरोग्य यंत्रणा मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून असल्याचे दिसून येत आहे.
   वयोमानानुसार ठराविक टप्प्यात ज्येष्ठांना गुडघेदुखी, सांधेदुखी आणि वात या व्याधींमुळे असह्य असा त्रास होतो. या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांचे डॉक्टरांकडे हेलपाटे चालू होतात. परंतु त्या व्याधींवर उपचाराच्याही मर्यादा असल्याने ‘डॉक्टरकडे जातोय पण कुठला गुणच येईना,’ अशी ओरड ज्येष्ठ व्यक्ती बोलून दाखवित असतात.
   खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, व्यायामाचा अभाव, धकाधकीची जीवनशैली यामुळे व्याधी जडतात. काही रुग्ण अस्थिरोग तज्ज्ञ किंवा आयुर्वेदिक रोग तज्ज्ञ यांच्याकडे धाव घेतात,भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाला अनन्य साधारण महत्त्व आहे.आयुर्वेदात अनेकदा आजीबाईचा बटवा कामी आला आहे. परंतु सध्या याच आयुर्वेदाला बदनाम करत गुडघेदुखी, सांधेदुखी, वात तसेच मणक्याच्या आजारावर आयुर्वेदिक औषधांची विक्री ग्रामीण भागात भोंगे लावून खुलेआम फिरणाऱ्या वाहनांतून किंवा बाजारात स्टॉल लावून बसणाऱ्या फिरस्त्यांकडून होत आहे. या बोगस औषध विक्रेत्यांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. हे औषध विक्रेते अशा बाधित रुग्णांना गाठून झाडपाल्याचे औषध आहे, याने कुठलाही ‘साईडइफेक्ट’ होत नाही असे पटवून देतात आणि अशा रुग्णांच्या गळी ही औषधे जास्तीचे पैसे घेत उतरवतात. डॉक्टरकडे जावं लागत नाही, तपासणीची फी द्यावी लागत नाही, इतर तपासण्या पण नाही म्हणजे इतर खर्च नाही असे बोलून रुग्णांकडून पैसे उकळले जात आहेत.
   अनेकजण आजारांना कंटाळलेले असतात. बरेच दिवस उपचार घेऊन हे आजार बरे होत नसल्याने ही औषधे घेऊन बघू असा विचार करून तेही फसतात. काही रुग्ण तर महिन्याला ५ ते १० हजार रुपयांची औषधे आणत आहेत. ही औषधे आयुर्वेदिक आहेत की नाही हे देखील सांगता येत नाही त्यामुळे या सर्व गैर प्रकारावर सोलापूर जिल्हा औषध प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!