political

कोणता झेंडा घेऊ हाती..? सांगोल्यात मतदार,कार्यकर्ते सैरभैर.!

"जय-विरू" यांच्या मैत्रीत दुरावा ? दोन्ही डॉक्टर बंधू पैकी कोण ?

 

सांगोला / विशेष प्रतिनिधी

सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या तरी महायुती व महाविकास आघाडी मध्ये “तुमचं आमचं जमेना.. आणि तुमच्या शिवाय करमे ही ना..” अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे त्यामुळे प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या या दोन्ही गटांमध्ये वातावरण अलबेल असल्याचे दिसत नाही.
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने सांगोला तालुक्यासह जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन आबांनी माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी असल्याचे ठासून सांगितले आहे त्यामुळे त्यांची विधानसभा लढविण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत आर-पार ची भूमिका असल्याचे दिसत आहे गावभेट दौरे व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे तर विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी सुरुवातीलाच मी मैदान सोडलेलं नाही.! मी नेहमीच मैदानात असतो.! अशी गर्जनाच केली असल्याने हे दोन्ही मातब्बर नेतेमंडळीची जनसामान्यांपर्यंत पोहोचून आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोमाने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
तालुक्यासोबतच इतर राज्यात वास्तव्यास असणाऱ्या मतदारांना देखील हे दोन्ही नेते साद घालत असल्याचे पाहायला मिळत आहे आबा व बापू हे दोन्ही नेत्यांची राजकारणा पलीकडची मैत्री सर्वश्रुत आहे तर महायुतीकडून उमेदवारीची माळ विद्यमान आमदार शहाजीबापू यांच्या गळ्यात पडणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने दिपकआबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत आपली उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे आबा कोणत्या पक्षात जाणार ? की अपक्ष विधानसभा लढवणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
सांगोला तालुक्यासह जिल्हा व राज्यभरामध्ये “जय-वीरू” ची जोडी म्हणून प्रसिद्ध असलेली “आबा-बापू” यांची मैत्री आगामी काळात देखील अशीच राहील असे देखील विविध व्यासपीठावरून या दिग्गज नेत्यांनी सांगितले आहे.त्यामुळे आगामी विधानसभा बाबतचा पेच कसा सोडविणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तर दुसरीकडे निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत असणारे शेतकरी कामगार पक्ष यांच्यामध्ये देखील दोन्ही डॉक्टर बंधू विधानसभेसाठी इच्छुक असून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून यंदा उमेदवारी आपल्या नेत्यालाच, गुलाल आपल्या नेत्याचेच, लक्ष २०२४ अशा प्रकारचे बॅनर सोशल मीडियावर झळकावले जात आहेत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सांगोला तालुक्यातील प्रमुख आणि मोठा पक्ष असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षामधून दोन्ही डॉक्टर बंधू पैकी उमेदवारी कोणाला मिळणार ? व त्यांची लढत कोणासोबत असणार ? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती विविध ठिकाणी ऐकायला मिळते.
राज्यभरामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघाची एक विशेष ओळख राहिली आहे ती स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी याच मतदारसंघातून तब्बल ११ वेळा निवडून येण्याचा इतिहास रचला १९९५ च्या निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांनी अल्पमताने का होईना बाजी मारली होती तर २०१९ च्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत डॉ. अनिकेत देशमुख यांचा निसटता पराभव झाला व शहाजीबापू पाटील यांना मा.दिपकआबांच्या आधाराने आमदारकी मिळाली होती मात्र दिपकआबांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केल्याने व आमदार शहाजीबापू पाटील यांनी मी नेहमीच मैदानात असतो.! या सूचक वक्तव्यावरून बापू यांनी एका वाक्यात अनेकांना इशारा व सल्ला दिले असल्याचे दिसत आहे आगामी निवडणुकीच्या मैदानात बापू असणारच हे त्यावरून स्पष्ट झाले आहे त्यातच त्यांच्या विशिष्ट अशा भाषण शैलीमुळे महायुतीतील विशेषतः शिवसेना (शिंदे) गटातील पक्षश्रेष्ठी यांच्याकडून बापूंच्या उमेदवारीला पहिली पसंती असल्याचे सर्वत्र चर्चिले जात आहे.
महाविकास आघाडी कडून हा मतदार संघ शेकापला सोडण्यात आला असून या ठिकाणहून डॉ.बाबासाहेब देशमुख किंवा डॉ. अनिकेत देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून ठासून खात्रीशीर सांगण्यात येत आहे.
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी गत वेळी आमदार शहाजीबापूंना पाठिंबा दिल्याने त्यांचा काठावर विजय झाला होता मात्र यंदा तशी परिस्थिती राहिलेली दिसत नाही माजी आमदार दिपकआबा यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याने मात्र विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांना ही निवडणूक तारेवरची कसरत राहणार आहे.
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी विधानसभा लढवण्याच्या दृष्टिकोनातून झंजावती गावभेट दौरे केले असून इतर राज्यात वास्तव्यास असणाऱ्या मतदारांच्या गाठीभेटी घेत केलेल्या दौऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे व आबांनी आमदारकी लढवण्यासाठी लोकआग्रह असल्याचे सांगितले आहे त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतकरी कामगार पक्षाचे दोन्ही नेते डॉ.देशमुख बंधु हे विविध कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावर एकत्र दिसत आहेत तर बापू-आबा हे नेते देखील जाहीर कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात प्रतिस्पर्धी असणाऱ्या नेत्यांच्या या भूमिकेमुळे मतदार राजा मात्र चांगलाच संभ्रमात पडला आहे, अशा या राजकीय परिस्थितीमुळे कार्यकर्त्यांना मात्र..कोणता झेंडा घेऊ..हाती ? हा प्रश्न पडला असून कार्यकर्ते मात्र सैरभैर झाल्याचे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!