राज्यातील महायुती सरकारने ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रलंबित प्रश्न लावला मार्गी
सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी जल्लोष करीत आमदार शहाजीबापू पाटील यांचे मानले आभार

सांगोला /तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील ग्रामरोजगार सेवकांनी २००७ साली नियुक्ती झाल्यापासून तुटपुंज्या कमिशनवरती काम केले . नियुक्ती झाल्यापासून ग्रामरोजगार सेवकांनी आपल्याला मानधन मिळावे अशी सरकारकडे वारंवार मागणी केली होती. शेकडा ७५ पैसे , २ रुपये २५ पैसे अशा अल्प कमिशनवर काम केले .त्यानंतर २०१४ साली ६ टक्के , ४ टक्के व २.२५ टक्के कमिशन देण्यात येत होते.
ग्रामरोजगार सेवकांची मागणी लक्षात घेता राज्यातील महायुती सरकारच्या ३० सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत २८ हजार ग्राम रोजगार सेवकांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ग्रामरोजगार सेवकांना मासिक ८ हजार रुपये मानधन व २ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील २८ हजार ग्राम रोजगार सेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले . सांगोला तालुक्यातील ७६ ग्राम रोजगार सेवकांना या वाढीव मानधनाचा फायदा होणार आहे. सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष तुकाराम मिसाळ, उपाध्यक्ष लक्ष्मण लेंडवे यांनी पंचायत समिती समोर गुलालाची उधळण करीत शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयामध्ये भेट देऊन आमदार शहाजीबापू पाटील यांचे आभार व्यक्त केले.
महायुती सरकारने ३० सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील २८ हजार ग्रामरोजगार सेवकांना प्रति महिना ८ हजार रुपये मानधन व २ हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर केला. त्याबद्दल सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचा १७ वर्षाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागल्याने संघटनेकडून शासनाचे आभार मानण्यात येत आले.
शासनाकडून मिळणाऱ्या मानधनामुळे सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेकडून आनंदउत्सव साजरा करण्यात आला. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये ग्रामरोजगार सेवकानी भेट दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांनी ग्रामरोजगार सेवकांना शुभेच्छा दिल्या.