आमदार शहाजीबापू पाटील व डॉक्टर देशमुख बंधू यांनी मला पाठिंबा द्यावा:- माजी.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील.
दिपकआबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली सोडचिठ्ठी.!

सांगोला / तालुका प्रतिनिधी
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दि. १५ ऑक्टोबर रोजी हॉटेल जयनीला सांगोला येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना दिपकआबा म्हणाले की गेल्या ३० ते ३५ वर्षे मी राजकीय जीवनात सक्रिय आहे देशाचे नेते शरदचंद्र पवार आणि राज्याचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण आजवर राजकीय भूमिका पार पाडली आहे नेत्यांचा आणि पक्षाचा आदेश मानून आजवर आपण पक्षाने आणि नेत्याने देईल त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार केला आणि त्यांना निवडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की गेल्या वर्षभर मी सांगोला तालुक्यात ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्या तसेच मुंबई,पुणे सह राज्याच्या बाहेरील कोलकत्ता, हैदराबाद आणि बेंगलोर मधील सांगोलेकरांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या व्यथा,वेदना जाणून घेतल्या आहेत.
सर्वसामान्य नागरिकांचे सुखदुःख जाणून घेत असताना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही कसल्याही परिस्थितीत लढायलाच पाहिजे असा आग्रह तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनता धरत आहे.
माझ्यासाठी येणारी विधानसभेची निवडणूक सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांनी हातात घेतली आहे त्यांनीच आता मी विधानसभेची निवडणूक लढवावी असा निर्धार केला आहे कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या प्रामाणिक भावनेचा आदर करून मी यंदाची विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायची असा ठाम निश्चय केला आहे.
सध्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहे माझा पक्ष सध्या महायुतीत असून महायुती मधून मी सांगोला विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केली होती परंतु सांगोला विधानसभेची जागा विद्यमान आमदार यांना मिळेल असे वरिष्ठ पातळीवरून सुतोवाच मिळाल्याने मी माझ्या सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज मंगळवार दि. १५ ऑक्टोबर रोजी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी आदरणीय शरदचंद्र पवार व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम अविरतपणे केले आहे,पक्षाचा आदेश प्रमाण मानून गेली वीस वर्षे शेतकरी कामगार पक्षाचे ऋषितुल्य नेतृत्व,दिवंगत गणपतराव देशमुख यांना आमदार करण्यात मी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमचे मित्र व सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला प्रत्येक वेळी मी माझी भूमिका जाहीरपणे आणि ठामपणे पक्षातील नेते तसेच जनतेसमोर मांडली राजकीय जीवनात मी कधीच व्यासपीठावर एक आणि जनतेत एक अशी भूमिका घेतली नाही गेली ३० ते ३५ वर्षे मी राजकीय जीवनात सक्रिय आहे या काळात अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाला पूरक राजकीय भूमिका घेतली आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख यांना आमदारकीचा विश्वविक्रम करण्यात मदत केली आहे.
त्यामुळे त्यांचे नातू डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख या दोन डॉक्टर बंधूंनी तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा या दोन्ही डॉक्टर बंधूंचा राजकीय अनुभव किंवा राजकीय कारकीर्द तुलनेने माझ्यापेक्षा लहान आहे दोघांनाही भविष्यात संधी मिळू शकते जर त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मदतीची भूमिका घेतली तर याचा आम्हीही भविष्यात नक्कीच विचार करू.
त्याचबरोबर आमचे मित्र तसेच सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनीही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार करण्यात आपण महत्त्वाची भूमिका बजावली याची जाणीव ठेवून सांगोला तालुक्यातील जनतेच्या भावनेचा आदर करून दोन्ही पक्षातील नेते मंडळींनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा व शेतकरी कामगार पक्षातील नेते मंडळींनी आणि विद्यमान आमदार शहाजीबापू यांनीही पाठिंबा द्यावा असे जाहीर आवाहन यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.