इनोव्हा कारची बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक; सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
इनोव्हा कारवर बजाज फायनान्सचे २६ लाख ५६ हजार रुपयांचे कर्ज असतानाही बनावट कागदपत्रे देवून जुने वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकाची १८ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामहरी पांडुरंग गवळी (रा.लोटेवाडी ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर परशुराम रामोळे (रा. जुने अशोका स्कूल, नाशिक) व सलमान उस्मान शेख (रा. खोडेनगर, नाशिक) यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रामहरी पांडुरंग गवळी (रा.लोटेवाडी, ता. सांगोला) हे गेल्या वीस वर्षापासून जुने वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. त्यांनी सोलापूर येथील प्रमोद लक्ष्मण ढावरे यांच्यासोबत बरेच व्यवहार केले आहेत. प्रमोद ढावरे यांनी एम.एच.१५ एच.यु.४५४६ या इनोव्हा क्रीस्टा कारचे फोटो पाठविले होते व सदरची गाडी नाशिक येथील एजंट सलमान शेख यांचेकडे आहे असे सांगितले होते. रामहरी गवळी यांनी सलमान शेख यास फोन करून सदर गाडीबाबत चौकशी करून ते आणि नवनाथ कुंभार असे दोघे नाशिक येथे गेले. त्यांनी फोन केल्यावर सलमान शेख व ज्ञानेश्वर परशुराम रामोळे एम.एच.१५ एच.यु.४५४६ ही इनोव्हा क्रिस्टा गाडी घेवून आले. रामोळे याने इनोव्हा क्रिस्टा कारवर बजाज फायनान्सचे लोन होते, ते भरले असल्याचे पत्र दाखविले. त्यानंतर सदर गाडीचा १९ लाख रुपयांना व्यवहार ठरला.
रामहरी गवळी यांनी मुलगा प्रद्युम्न यांच्या बँक खात्यातून रामोळे यांच्या बैंक खात्यात ९ लाख रुपये तर स्वतःच्या खात्यातून ८ लाख रुपये असे एकूण १७ लाख रुपये पाठवले. त्यानंतर रामोळे याने सर्व कागदपत्रे नंतर पाठवून देतो, त्यानंतर राहिलेले २ लाख रुपये द्या असे सांगितले. त्यानंतर गवळी यांनी वारंवार वाहनाच्या कागदपत्राबाबत ज्ञानेश्वर रामोळे व सलमान शेख यांचेशी फोनवर संपर्क केला असता त्यांनी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. राहिलेले २ लाख रुपये पाठवा मी कागदपत्रे पाठवितो असे सांगितल्याने गवळी यांनी १ लाख रुपये पाठवून दिले. दरम्यान, रामहरी गवळी यांनी चौकशी केली असता त्यांना त्यावर बजाज फायनान्सचे २६ लाख ५६ हजार ३९६ रुपयांचे कर्ज असल्याची माहिती बजाज फायनान्सकडून मिळाली. त्यामुळे त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात येताच गवळी यांनी ज्ञानेश्वर रामोळे व सलमान शेख यांना फोनद्वारे संपर्क करून तुम्ही मला खोटी माहिती का दिली ? असे विचारले असता त्यांनी लोन भरून घेतो तुम्ही काही काळजी करू नका असे सांगितले. त्यानंतर ज्ञानेश्वर रामोळे याने वाहनावरील कर्ज भरले असल्याचे पत्र पाठवले. गवळी यांनी बजाज फायनान्स कंपनीमध्ये जावून रामोळे यांनी पाठविलेले पत्र दाखविले असता त्यांनी ते पाहून खोटे व बनावट असल्याचे सांगून गाडीवर २६ लाख ५६ हजार ३९६ रुपये इतके कर्ज असल्याचे सांगीतले असे रामहरी गवळी यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नोंद असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाणे कडून मिळाली आहे.