Sangola

विधानसभा निवडणुकीतील यशाने आम्ही हुरळून जाणार नाही.- नूतन आमदार बाबासाहेब देशमुख

माझ्यासहित सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची वाढली जबाबदारी

सांगोला: प्रतिनिधी

  तुमचा पाठिंबा आणि विश्वास हीच माझी ताकद आहे. जनतेच्या भल्यासाठी काम करणे हेच माझे ध्येय असून, भविष्यातही मी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहीन. आपले प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या असे आवाहन करत विधानसभा निवडणुकीतील यशाने आम्ही हुरळून जाणार नाही असे मत सांगोलाचे नूतन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.

   डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता . निवडणुकीनंतर जेवढे मताधिक्य तेवढे वृक्षारोपण लावण्याचा त्यांनी संकल्प केला असून शनिवारी मुंबईहून त्यांचे सांगोला येथे आगमन झाले. यावेळी सर्वसामान्य नागरिकानी मोठी गर्दी केली होती. सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्त्यांनी हार तुरे याऐवजी रोपे देऊन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे अभिनंदन करत आहे.यावेळी ते बोलत होते.आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन अशी ग्वाही उपस्थितांना दिली.

   यावेळी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की, सांगोल्याच्या सर्वसामान्य जनतेसमोर मी नतमस्तक होत असून हा विजय आमची जबाबदारी वाढवणारा आहे. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्याप्रमाणे माझ्यावर सांगोल्यातील सर्वसामान्य जनतेने मोठा विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे आम्हाला मतदार संघात खूप काम करावे लागेल, याची जाणीव होत आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.तालुक्याच्या प्रथम नागरिक म्हणून आता जबाबदारी वाढली आहे. विधानसभा निवडणुकीतील यशाने आम्ही हुरळून जाणार नाही. सर्वच गावांमध्ये शेतकरी कामगार पक्षाला चांगले यश मिळाले आहे. माझ्यासहित सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून आम्हाला इथून पुढे अधिक बारकाईने काम करावे लागेल. आम्ही जनतेच्या ऋणात राहू इच्छितो. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले..

यापुढील काळात सांगोला तालुक्यात हुकूमशाही, दादागिरी, गुंडगिरी, भाईगिरी अजिबात चालू देणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊनच ५५ वर्षाच्या परंपरेनुसार सांगोला मतदारसंघाचा कारभार करू. कोणाचीही अडवणूक अथवा वेठीस धरण्याचे प्रकार आता चालणार नाहीत. सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही असा खणखणीत इशाराही नूतन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!