सांगोला आठवडा बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ; सांगोला पोलीस शहर बिटला खमक्या अधिकाऱ्याची गरज.!
सांगोला /प्रतिनिधी
सांगोला शहरातील रविवारचा आठवडा बाजार हा मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांसाठी पर्वणी ठरत आहे त्यामुळे सर्वसामान्य शहरवासीयातून सांगोला पोलीस स्टेशनच्या शहर बीटच्या कामकाजाबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
त्यातच शहर बीट कडून काहीच ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने शहर बीटच्या नाकावर टिच्चून चोरटे आपला हात साफ करत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे गेल्या अनेक दिवसांपासून दर रविवारी आठवडा बाजारात मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत गेल्या आठवडा बाजारात अनेक मोबाईल चोरट्यांनी हातोहात मोबाईल लंपास केले आहेत, मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना एखादा अपवाद वगळता सपशेल अपयश आले असल्याचे दिसून येत आहे, गर्दीचा फायदा घेत रविवारी आठवडा बाजारातून मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने चोरट्यांनी आठवडा बाजारात घातलेला हा धुमाकूळ पाहता शहरवासीय नागरिक, व्यापारी चांगलेच हैराण झाले आहेत तर अचानक पणे मोबाईल चोरीला गेल्याने अनेकदा बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सांगोला पोलीस शहर बीटच्या कार्यपद्धतीवरती सर्वसामान्य शहरवासीयातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.
शहर बिटला खमक्या अधिकाऱ्याची गरज..
कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकाने नुकतेच काही दिवसांपूर्वी सांगोला शहरात अवैध धंद्यांवर धडक कारवाया केल्या होत्या मात्र या अवैध धंद्यांवर तसेच शहरातील वाढत्या चोऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी शहर बीट सपशेल अपयशी ठरत असल्याचे दिसत असल्याने आता सांगोला शहर बिटला खमक्या अधिकाऱ्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.