स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कामाचे १७ रोजी भूमिपूजन- मा.आम.शहाजीबापू पाटील.

सांगोला / तालुका प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या सुमारे २२ गावांसाठी वरदायिनी असणारी व गेली २५ वर्षे मंजुरीच्या प्रतिक्षेत असणारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना म्हणजे पूर्वीची उजनी उपसा सिंचन योजना या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन व शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २:३० वाजता चिकमहूद येथे होणार असल्याची माहिती माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली भूमिपूजनाच्या कार्यक्रमासोबत कार्यक्रम स्थळी शेतकरी मेळावा आयोजित केल्याची माहिती माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली.
सन २००० साली ७८.५९ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता या योजनेला मिळाली होती परंतु पुढील पाच वर्षे या योजनेवर कोणताही खर्च झाला नसल्याने २००५ साली प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली होती सन २०१९ साली आमदार झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांना या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू केला त्यांनी या योजनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला असे नामकरण शासनाकडून मंजूर करून घेतले व नव्याने १० गावांचा या योजनेमध्ये समावेश करून एकूण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष २२ गावांना या योजनेच्या दोन टीएमसी पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करून २७ फेब्रुवारी २०२४ रोजी ८८३.७४कोटी रुपयांच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यास आमदार शहाजी बापू पाटील यांनी यश मिळवले.
एकूण ८८४ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामांची निविदा विधानसभा निवडणुकीपूर्वीच प्रसिद्ध होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाचे आदेश देण्यात आले होते परंतु निवडणूक आचारसंहिता व मंत्रिमंडळ निवड यामुळे या कामाचे भूमिपूजन लांबले होते.
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन या योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्याची विनंती मुंबई येथे केली होती सर्व मान्यवरांनी सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी या योजनेच्या भूमिपूजन व शुभारंभ कार्यक्रमाला वेळ दिली असून सर्व मान्यवर हेलिकॉप्टरने महूद येथे येणार असल्याचे शहाजीबापू यांना कळविले आहे.
या योजनेचे काम सुरू होणार असल्याने २२ गावांमधील सुमारे १३ हजार ५५ हेक्टर शेतजमिनींना बंदिस्त नलिकेद्वारे शेतीला लवकरच कायमस्वरूपी पाणी मिळणार असल्याने सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपणार असून पुढील टप्प्यातील उर्वरित कामानाही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती शहाजीबापू पाटील यांनी दिली.