रक्तदानासाठी व्यापक जनजागृती गरजेची :- पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी.
सोलापूर, ता. २७ : रक्तदान म्हणजे जीवनदान आहे, गरजुंना वेळेत रक्त न मिळाल्यास त्यांचे प्राण जाऊ शकतात, हे माहिती असूनही आपल्याकडे आवश्यकते प्रमाणे रक्तसंकलन होत नाही त्यासाठी व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.
डॉ. हेडगेवार रक्तपेढी आणि सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस विभागाच्यावतीने २६ नोव्हेंबर शहिद दिन व संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागिय पोलीस अधिकारी (गृह) विजयालक्ष्मी कुर्री, रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरुपे, सचिव सत्यनारायण गुंडला, कोषाध्यक्ष सुहास जोशी उपस्थित होते.
यावेळी पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे आणि रक्तपेढीच्या जनसंपर्क अधिकारी संगीता मेंथे-कोरे यांनी सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक व्यवस्थापक रंगनाथ जोशी यांनी केले. पोलिस निरीक्षक अतुल मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. पोलिस निरीक्षक निंबाळकर, नामदेव शिंदे, कुंदन गावडे, राखीव पोलिस निरीक्षक प्रकाश शिंदे, रक्तपेढीचे सुनील हरहरे, दिलीप बनसोडे, रवि कोटा, डॉ. आनंद वैद्य आदी उपस्थित होते.