चोरीचे सोने विकायला आलेल्या इसमाला सांगोला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
महूद मध्ये चोरीचे २३ लाख २६ हजार २५० रू.किमतीचे सोने जप्त.

सांगोला / प्रतिनिधी
सराफ दुकानदारास चोरीचे सोने-विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले आहे.
त्या व्यक्तीकडून सुमारे २३ लाख २६हजार २५० रुपये किमतीचे ४२६ ग्रॅम वजनाचे १६.९९ कॅरेट चे सोने जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई मंगळवार, दि. १७ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास महूद (ता. सांगोला) येथे करण्यात आली.
याबाबत पोलिस हेड.कॉ. अस्लम काझी यांनी अतुल सुरेश धोत्रे (वय २६, रा. गार्डी, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२४ प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सांगोला पोलीस स्टेशनचे पोलिस.हेड.कॉ. अस्लम काझी हे मंगळवार, दि. १७ रोजी महूद दूरक्षेत्र हद्दीतील दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बातमीदार मार्फत एक संशयित हा महूद येथील एका सराफ दुकानामध्ये चोरीचे सोने विक्री करिता आल्याचे गोपीनाय माहिती मिळाली. त्या आधारे पोलिस हेड कॉन्स्टेबल काझी व पोलिस हेड.कॉ. बोराडे यांनी मिळून ज्वेलर्सच्या ठिकाणी चौकशी केली असता सदर ज्वेलर्समधून बाहेर येत असलेल्या एकजणाकडे बातमीदारांने बोट दाखवल्याने पोलिसांनी त्याच्याजवळ जाऊन आपण पोलिस असल्याची ओळख सांगताच पोलिसांना पाहून तो भांबावून गेला व
पोलिसांनी त्याला नाव, गाव, पत्ता विचारला असता त्याने अडखळत सांगू लागल्याने व तो त्याच्या खिशावर हात दाबू लागल्याने पोलिसांना त्याचा संशय आला म्हणून त्यास महूद येथील दूरक्षेत्र कार्यालयात नेऊन चौकशी करत त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात १०० रुपयांच्या ४ नोटांसह अंदाजे ४०० ग्रॅम वजनाचे सोने मिळून आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.