स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी.
टेंभूर्णी - पंढरपूर महामार्गावरील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ४ आरोपी जेरबंद; १ लाखाचा मुद्देमाल जप्त.

सोलापूर / प्रतिनिधी
टेंभुर्णी-पंढरपूर महामार्गावरील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ४ आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना यश आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की संदीप जाधव (रा. जैनापूर, विजयपूरा) हे त्यांच्या साथीदारासह चाकण, जि. पुणे येथे बकरीचा व्यापार करून दि. ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे विजयपूरकडे पिक-अप वाहनातून जात होते. त्यांचे वाहन हे टेंभूर्णी पोलीस ठाणेच्या हद्दीतून पंढरपूर रोडने जात असताना परीते पाटीजवळ गतिरोधक जवळ आले असता पाठीमागुन लाल रंगाचे पल्सर मोटार सायकलवरील अज्ञात चोरट्यांनी येवून कोयत्याने वार करून त्यांचेकडील रोख रक्कम व दोन मोबाईल असा एकूण २ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल जबरी चोरी करून नेला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी रविराज कांबळे,पोलीस उपनिरीक्षक यांनी पथकासह टेंभूर्णी व अकलूज भागात पेट्रोलिंग करून व गोपनिय बातमीदार यांच्या मार्फत आरोपींचा शोध घेत होते त्यामध्ये अकलूज येथील बातमीदार यांचेकडून माहिती मिळाली होती.
त्यावरून पोलीस.उपनिरीक्षक. कांबळे यांच्या पथकाने अकलूज येथे तळ ठोकून जास्तीत जास्त माहिती गोळा केली व सदरचा गुन्हा करणारे आरोपींची नाव निष्पन्न केले तसेच ते आरोपी अकलूज बाजारतळ येथे येणार असल्याची माहिती प्राप्त केली. त्यावरून तेथे सापळा रचून ४ आरोपींना ताब्यात घेवून तपास करता त्यांचेकडून रोख रक्कम, गुन्ह्यात गेलेला मोबाईल व वापरलेली मोटार सायकल असा सुमारे १ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोर्पीना पुढील तपासकामी टेंभूर्णी पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण) प्रितम यावलकर (अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, (पोलीस .निरीक्षक, स्था.गु.शा.) यांचेसह पो.उप.नि रविराज कांबळे, सहा. फौजदार निलकंठ जाधवर, पो हे/ प्रकाश कारटकर, विरेश कलशेट्टी, पो.ना धनराज गायकवाड, पो.कॉ अजय वाघमारे, अन्वर आत्तार, राहूल दोरकर, हरीश थोरात, बाळराजे घाडगे, सुनिल पवार यांनी पार पाडली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर यांच्याकडून मिळाली आहे.